श्रीकृष्ण जन्म (गोकुळाष्टमी )
हिंदू धर्मात इतके सण व उत्सव आहेत कि, सारे वर्ष कसे संपते हेसुद्धा कळत नाही. भारतीय संस्कृतीने गुणांचा गौरव केलेला आहे. त्यात त्यांनी कोणत्याच प्रकारचा भेद ठेवलेला नाही. पशु, पक्षी, प्राणी, वृक्ष यांच्या गुणांचा गौरव करून त्यांना सन्मानित केलेले आहे. अशा या सणांमध्ये स्रियांचा जास्त सहभाग असतो, परुंतु गोकुळाष्टमी व दहीहंडी हा मुलांचा, पुरुषांचा उत्सव आहे.
श्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्णाचा जन्म झाला. श्रीकृष्णाला विष्णूचा अवतार समजतात. ते भारतीयांचे आवडते दैवत आहे. मथुरा, पुरी, गोवर्धन, वृंदावन, द्वारका, जगन्नाथपुरी, बनारस, या ठिकाणी जन्माष्टमीच्या उत्सवाचा, आनंदाचा जल्लोष पाहावयास मिळतो. सर्व वर्णाचे लोक हा तिवस महत्वाचा मानतात. कृष्णमंदिराबरोबरच विष्णूच्या मंदिरातूनही हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाचे वेळी पूजा, प्रवचन, भजन, कीर्तन,मंत्रघोष अशा विविध कार्यक्रमांनी दिवस, रात्र कशी संपते हेच कळत नाही. नवमीला 'गोविंदा आला रे आला ' म्हणून नाक्यानाक्यावरील दहीहंड्या फोडल्या जातात. हंडीच्या खापऱ्या गाईच्या गोठ्यात पुरून ठेवल्या की गाय जास्त दूध देते अशी भावना आहे. कृष्ण गोकुळात दह्या-दुधात वाढला, गोरगरीब लोकांच्या व सवंगड्यांच्याबरोबर खेळला, सुदाम्याचे पोहे, आवडीने खाल्ले म्हणून नवमीला दहीपोह्यांचा प्रसाद वाटला जातो. 'गोविंदा रे, गोपाळा रे' च्या तालावर तरुण मुले नाचत, गात मिरवणूक काढतात. आबालवृद्धांना आवडणारा देव म्हणून श्रीकृष्णाकडे पहिले जाते. श्रीकृष्णाने कंसाला ठार मारून उग्रसेनाला राज्यावर बसविले. शिशुपालाचा नाश केला. तर नरकासुराला ठार मारले. यमुनेच्या डोहात दांडी मारून बसलेल्या 'कालिया' या विषारी सर्पाची खोड मोडून काढली. प्रजेला सुखी केले. द्वारकेचा राजा होऊन उत्तम प्रकारे राज्य केले. प्रजेला सुखी-समाधानी ठेवण्यातच समाधान मानले. कौरव-पांडव एकत्र यावेळी म्हणून शिष्टाई केली. परंतु दुर्योधनामुळे ती सफल झाली नाही. शेवटी युद्ध झालेच. अर्जुनाला गीतेच्या आधारानं उपदेश करून कर्तव्याची जाणीव करून दिली. शंकांचे निरसन केले. पांडवांना मार्गदर्शन लाभले. भगवत् गीता हे जीवनाचे सर आहे. पाच हजार वर्ष होऊनसुद्धा श्रीकृष्ण विसरला जात नाही. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, तेव्हा तेव्हा श्रीकृष्णाची आठवण येते. दुर्जनांचा नाश, सज्जनांचे रक्षण व मानवधर्माचा स्थापना करणाऱ्या या भगवंताला माझे शतशः प्रणाम ! |
|